जी.एं.ची एक कथा
गीत पाखरू !
-----------------
पथिकानं त्या वृद्धाच्या पुढयातील वाटीत ठेवलेल्या रत्नासारख्या अनेक रंगांच्या बियांमधील नीलमण्यासारखे दिसणारे बी उचलले.
'' याला मैत्रीचे फूल येईल !'' वृद्ध म्हणाला,
''त्याचा रंग आभाळाच्या तुकड्यासारखा असतो..आणि गंध जाईचा असतो ! त्याच्या गंधामुळे प्रवास कितीही दूरचा असो, शरीर दमत नाही..मन कोमेजत नाही..पण ते रूजायला फार फार वर्षं लागतात !..तुझ्याने तेवढा धीर धरवेल का ?''
पथिकाने उत्साहाने मान हलविली. एक दीर्घ नि:श्वास टाकून वृद्धाने ते बी त्याच्या हातावर ठेवले..पण पथिकाचे समाधान झाले नाही..त्याने सूर्याच्या पहिल्या किरणासारखे, माणकाच्या तुकड्याएवढे एक बी उचलले.
'' हे बी आहे प्रीतिचं !..ते अगदी ठिणगी पडल्याप्रमाणे वाढते..किंवा पाहता पाहता गोठून मरतं ! पण ह्याच्या फुलाचा प्रकाश अंधारात दिसतो..प्रवासात एखादा रक्ततारा मार्ग दाखवत असल्याप्रमाणे ते सोबत र।हातं..पण त्याला सांभाळून हात लाव !
कारण त्या पाकळ्याच्या कडांना विषारी धार असते..त्यांनी काढलेले रक्ताचे ओरखडे कधी बरे होत नाहीत !..''
पथिकानं मोराच्या मानेप्रमाणे गडद नीळसर हिरव्या..आत एक ठिणगी जळत आहे, अशा जांभळ्या..आंब्याच्या कोवळ्या पालवीसारख्या तांबूस लालसर..कस्तुरीमृगाच्या पाठीसारख्या गडद तपकिरी..अशा अनेक बिया गोळा केल्या...
'स्वप्नांची किंमत द्यावी लागते ती..ती उचलताना नव्हे..तर ती फेकून देताना !'..हे त्या पथिकाला अद्याप माहीत नव्हते.
वृद्धाचा चेहरा अधिकच सुरकुतला.
तो म्हणाला,
'' कशाला इतक्या बिया नेतोस ? त्यातील एक रूजवायला आयुष्य खर्चावं लागतं..हाडांच्या काड्या होतात..वेड्याप्रमाणे श्रद्धा ठेवावी लागते !''
....जी. ए. कुलकर्णी ( गीत पाखरू !)

0 comments:
Post a Comment