माझा एक मित्र केवळ मन मोकळं करायला घरी आला
मन मोकळं करायला म्हणजे रडायला
खरच हुंदके देऊन रडला
प्रत्येकाच्या दूःखाचं स्वरूप प्रमाण व्याप्ती वेगळी असते.
हळदी ने भरलेल्या बरणी सारखं दूःख नेमकं दाखवता येत नाही
कधी कधी ठिपक्या एवढं सुध्दा दूःख असू शकतं पण ते असतं. त्याची नोंद करावी लागते दखल घ्यावी लागते फुंकर घालावी लागते.
आणि फुंकर तोच घालू शकतो जो समजून घेतो. त्या ठिपक्या एवढ्या दूःखाला मान्यता देतो. खांद्यावर थोपटत "तुला काय म्हणायचय मी समजू शकतो "असं सहानुभूतीपूर्वक म्हणतो. म्हणूनच त्याने आमचं घर निवडलं
नाहीतर कोण हल्ली व्हाॅट्सप च्या जमान्यात मुलीचं लग्न ठरलं सांगायला रात्री साडेदहा वाजता कुणाच्या घरी जाईल?
बोलण्याला सुरुवात तर छान झाली
पण मग बुरुज ढासळल्या सारखा तो ढासळत गेला.
सई आता तेवीस वर्षांची म्हणजे तशी लहान नाही. त्यात तिचं लग्न तिनेच जमवलेलं म्हणजे जबरदस्तीचा मामला नाही.तरी एक बाप म्हणून माझ्या मित्राचं दूःख खरं होतं
म्हणाला ती दहावीत असताना तिची आई गेली. विरजण लावण्या पासून ते कामवालीच्या पगार देण्यापर्यंत सगळी जबाबदारी तिनेच उचलली त्यात दहावीचं वर्ष
पण खूप छान गुण मिळवले खूप मेहेनत घेतली, का?तर गेलेल्या आईवर ठपका लागू नये. ऐनवेळेस गेली आणि मुलीचं नुकसान करून गेली. बाॅटनी मधे पहिल्यापासून रस होता त्या मुळे ती त्या साईड ला गेली ज्ञानेश बालमित्रच होता. दहावीत असतानाच मला डाऊट होता पण प्रोत्साहन नको म्हणून मीच कधी विचारलं नाही. पण काॅलनीत काय अशा गोष्टी लपून राहतात?
ज्ञानेश च्या घरी पण हे ओपन सिक्रेट होतं. सुनेशी वागावं तसच ज्ञानेश चे आईबाबा तिच्याशी वागत होते
पण विषय निघाला तेंव्हाच मी स्पष्ट सांगितलं होतं "लग्नाला माझी ना नाही. पण मला सई चं लग्न मला लवकर करून द्यायचं नाही.
आई गेल्यापासून फार लवकर मोठी झाली ती. मला आता तिचे खूप लाड करायचेत.तिला थोडी निवांत जगताना बघू दे मला.
त्यांनी पण मान्य केलं होतं पण नियतीच्या मनात काही वेगळच होतं. ज्ञानेश ची आई तडकाफडकी गेली
आणि त्यांच घर उघड्यावर पडलं त्यात ज्ञानेश चा भाऊ अगदीच लहान त्याला सई चा लळा आहे. आई गेल्याचं अजून त्याच्या पचनी पडलेलं नाही. आणि लग्न या वर्षीच करायला हवं नाहीतर पुढे तीन वर्ष करता येणार नाही.
ज्ञानेश चे बाबा म्हणतात ही जाताना घराची सोय करून गेली.
माझी मुलगी सोय म्हणून त्या घरी जाणार का रे?
मी त्याला शांत करत म्हणालो शब्दः अर्थ घेऊ नकोस रे
ते बोलतांना असं म्हणत असले तरी ते सारं श्रेय आपल्या सई लाच देतायत तिच्याकडे सोय म्हणून नाहीतर उद्याची आशा म्हणून बघतायत. तुझं दूःख वेगळच आहे
अचानक हातून काही निसटावं तशी सई तुझ्या घरातून चालली याचं तुला वाईट वाटतय. तिचे लाड करायला मिळाले नाहीत याचं तुला दूःख आहे
अरे पण तुझ्या प्रेमाने आणि मायेने तिला इतकं समर्थ समंजस बनवलं की एक कोलमडत्या घराला सावरण्याची जबाबदारी घ्यायला ती तयार झाली. नाहीतर ती पण लवकर लग्न करायला नकार देऊ शकली असती आणि त्यात कुणाला गैर ही वाटलं नस्त. पंचविशीतल्या मुलींचे आईबाप सुध्दा मुलींच्या लग्नाची घाई करत नाहीत
मग या वयात आपली मुलगी इतकी समजुतदार कर्तबगार निघाली ही आनंदाची गोष्ट आहे की दूःखाची?
#चंगो